मातेच्या कविता - मोहन पाटिल
१:
पाचोळ्याच्या दिसात
पदर ढळेस्तो सावरला, साम्भाळला
भेगाळले, घामेजुन ढेपाळत गाव भटकले
आता कणसात दाणे भरु लागलेत्
अशा वेळी तू कुठ आहेस?
२:
आभाळात मीच चंद्र राखुन ठेवलाय
ओटीत चांदण
सगळी रात उशालगत दिवा जाळुन
आठवणी उजाळल्या
दिवसाउजेडी तरी ये
३:
पिकात उभी राहून पीक झाले
पान हलताना मनोमन हसले
मातीची संगत सुटू ने म्हणून मातीत उतरले
मातीसुध्दा व्हाव वाटलं जीवाला
माझ्यातून तू उभारलास
वाढलास-फुलारलास-फळारलास
तू नाहीस, आता मला
माती व्हावंसं वाटत नाही
४:
सगळी पृथ्वी तुझ्यासाठी
माझ्यासाठी तू
५:
आता सगळं भिजलेलं असतं
पानं सुसाटतात, वारा हेलावतो
मन आतून गंधित, बधिरल्या मातीच्या सुवासानं
गंध उरत नाही
कुशीत तुझे श्वास नसतात
६:
काल फळ तोडताना
नाळेची आठवण जागी झाली
लहान असताना तू 'नारळा'ला
'नाळ 'र म्हणायचास
७:
तुला पेरताना
बाहेर काळोख होता
तुला पेरताना
तुला साठवताना
मी उमलत होते
माझी आण रे
अंधारात मी दिवस मोजीत होते
८:
तुला जन्म दिला
ती खूण
वासनेलगतच गोंदली आहे
भरल्यापोटी सहज म्हणून आठवण झाली
तर नाव घेत जा
९:
पाचोळ्याचं दिवस
भटकंती चालू होती
तुझं रक्त दुपारी पेटायचं
चौकात रक्त रांगोळी ओघळायची
कुठं हमरस्ता स्मशानवाट -
मला समजलं
तुझ्या मुठीतून उधळलेला अहंकार
उग्र होऊन चौकाचौकात गुरगुरायचा
पाखरा, मला हे सहायचं नव्ह्तं
कसं सांगू? रक्त सांडून मिळालेले घास
मला नको आहेत
१०:
तू माझाच, म्हणून मला गोड
तू माझाच, म्हणून मला वेड
तुझ्यात माझं रक्त, म्हणून मला प्रीती
तुझ्यात माझं रक्त्, म्हणून मला भीती
तू माझा, म्हणून माझ्यासारखा हो
तू माझा, म्हणून माझ्यातलं घे
तुझ्यातल्या रक्ताला प्रेमपूर्वक आव्हान
अरे, तुला माझी भीती वाटू दे
११:
मला आठवतो तो हरताळी दिवस
(बहुधा तू त्याच दिवशी गेलास)
तुझ्या खांद्यावर भार देऊन स्तब्ध राहिलेले कामगार
टाळा मिटून गप बसलेला कारखाना
मला आठवतं ...
पोटातल्या आतड्यावर कावळ्यांनी ताव मारून
क्रांतीकारी ढेकर दिली, समानतेच्या नावाखाली
तुला समानता हवी होती
पण अरे, माहित नसलेल्या गावचा रस्ता तरी विचारायचास!
मला आठवतं...
तू वाद खेळायचास
पुराणातल्या तिळाच्या समान वाटणीवर
द्रौपदीवर-
१२:
मला 'एक'च हवं
तू एकदाचा विश्वभरून शांत व्हावास
१३:
ढग अंधारून आले
उभ्या पिकाची नासाडी आरंभली
बुजगावण्यांनी किती थैमान घातलं
तृहा तृहा
मुखात भरवायचा घास मातीआड करावा लागला
श्रम वेचून पसरलेली दौलत सांभाळेस्तो दिशा धुपल्या
पाखरा, मी स्वतः हरवले, भटकले
तुझा शोध हाच ध्यास
तुझ्या हातांनी सावरावास, म्हणून टाहो फोडला
तुझी ओ नाही
तू गाव सोडून मुलुखभर पसरलेला
एक दिवस मी गाव हरवून बसेन्...
तुझ्यासाठी काय व्हावं ते होऊ घालेन...
पायातले काटे मस्तकापर्यंत रुततील...
अरे, कधीतरी भेटून मला 'माझी' म्हणालास
तर...अंगभर सुंदर फुलं उमलतील
१४:
तुझी निर्मिती कशी रे?
आतड्यातलं नाजूक पदर
जुळ्वून जुळवून, हळूवार हळूवार
तळपाय तळहाताइतकेच साजुक, छापील
सुरुवातीला अशी
जसं मस्तक चुंबायला मला पूज्य
तसे पाय कितीदा तरी
आताशा अलीकडे तुझं मस्तक भरकटून
तळपाय भेगाळलेत
किती भिन्न
मी दिलेलं सांभाळता आलं नाही
सांभाळता आलं तर एकच रक्त बिंदू
विषम प्रकाशी पाझरला नसता
अरे, तुझ्या सगळ्याच रक्ताचे घर्मबिंदू व्हावेत
इथल्या मातीत येऊन मिळावेत
१५:
तुला जवळ घ्यावं, न्याहाळावं
ह्रदय भरून गोंजारावं
तू एकदाचा गेलास,नी विश्व अंधारलं
तू येशील तो दिवस सोन्याचा होईल
मग तुझा इतिहास खोदेन, जगभर
सगळ्याच मातीवर
१६:
महिरपीचं तोरणं तोडून
गावपांढरं डोळ्यांआड करून
कूस तुडवून गेलास
ते वेळेपासून
शेंदर्या मारुतीच्या देवळात लामणदिवा पेटल्यावर
गावगाड्याच्या घरांच्या पडवीत
सावल्या कुजबुजतात
आता कसं होईल?
१७:
खळाभर रांगलेले बैल
गळाभर घुंगूरतात
सांजवेळ जवळल्यावर
दाव्याशी विसावतात
तुझी आठवण त्यांच्या पाठीवर थर्थरून उठते
त्यांची आण रे
ते घुंगूर तुझ्या नावाचा जप करतात
१८:
आताशा झोपून असते
डोळे पांगुळलेत, शब्द लडबडतात,
दिवसा स्वप्नं दिसते
काळ्या अंधारातून एक रत्नाळ तारा जवळ येतो
मजजवळ चिमुकली क्षमा मागतो
चेहर्यावर कुणीसं वाकून पाहतं
गावं शहरं जाणवतात
काही कळत नाही
डोळे पांगुळलेत, शब्द लडबडतात,
आताशा झोपून असते
१९:
माझी अंतीम इच्छा : काहीच नाही.
फक्त - मला पडवीत बसवल्यावर
तू येशीत असावास - -
2 comments:
wa wa....
masta
शब्द नाहीत प्रतिक्रिया लिहिण्यासाठी. काळजातले बोल आहेत.
Post a Comment