कुठल्याशा जागी देख।
मैदान मोकळे एक॥ पसरले॥
वृक्ष थोर एकच त्यात।
वाढला पुर्या जोमात॥सारखा॥
चहुकडेच त्याच्या भंवते।
गुडघाभर सारे जग तें॥तेथले॥
झुडुपेंच खुरट इवलालीं।
मातीत पसरल्या वेली॥माजती॥
रोज ती। कैक उपजती। आणखी मरती।
नाहिं त्या गणती। दादही अशांची नव्हती॥त्याप्रती॥
त्यासाठी मैदानात।
किती वेली तळमळतात॥ सारख्या॥
परि कर्माचें विंदान।
काहीं तरि असतें आन॥ चहुंकडे॥
कोणत्या मुहूर्तावरती।
मेघात वीज लखलखती। नाचली॥
त्या क्षणी। त्याचिया मनीं। तरंगति झणीं।
गोड तरि जहरी। प्रीतीच्या नवथर लहरी॥ न कळता॥
तो ठसा मनावर ठसला।
तो घाव जिव्हारीं बसला॥ प्रीतिचा॥
वेड पुरें लावी त्याला।
गगनातिल चंचल बाला। त्यावरी॥
जातिधर्म त्याचा सुटला।
संबंध जगशीं तुटला॥ त्यापुढें।
आशाहि। कोणती कांही। रहिली नाही।
सारखा जाळी। ध्यास त्यास तीन्ही काळी॥ एक तो॥
मुसळधार पाउस पडला।
तरि कधीं टवटवी त्याला॥ येइना॥
जरि वारा करि थैमान।
तरि हले न याचें पान॥ एकही॥
कैकदा कळ्याही आल्या।
नच फुलल्या कांही केल्या॥ परि कधीं॥
तो योग। खरा हटयोग। प्रीतिचा रोग।
लागला ज्याला। - लागतें जगावें त्याला॥ हें असें!॥
ही त्याची स्थिति पाहुनिया।
ती दीड वीतिची दुनिया॥ बडबडे॥
कुणी हंसे कुणी करि कींव।
तडफडे कुणाचा जीव॥ त्यास्तव॥
कुणि दयाहि त्यावरि करिती।
स्वर्गस्थ देव मनिं हंसती॥ त्याप्रती॥
निंदिती। कुणी त्याप्रती। नजर चुकविती।
भीतिही कोणी। जड जगास अवघड गोणी॥ होइ तो॥
इष्काचा जहरी प्याला।
नशिबाच्या ज्याच्या आला॥ हा असा॥
टोंकाविण चालू मरणें।
ते त्याचे होतें जगणें॥ सारखें॥
ह्रदयाला फसवुनि हंसणें।
जीवाला न कळत जगणें॥ वरिवरी॥
पटत ना। जगीं जगपणा। त्याचिया मना॥
भाव त्या टाकी। देवांतुनि दगडचि बाकी॥ राहतो॥
यापरी तपश्चर्या ती।
कीती झाली न तिला गणती॥ राहिली॥
इंद्राच्या इन्द्रपदाला।
थरकांप सारखा सुटला॥ भीतिने॥
आश्चर्ये ऋषिगण दाटे।
ध्रुवबाळा मत्सर वाटे॥ पाहुनी॥
तों स्वतां। तपोदेवता। काल संपतां।
प्रकटली अंती। "वरं ब्रूहि" झाली वदती॥ त्याप्रती॥
"तप फळास आलें पाही।
माग जें मनोगत कांही॥ यावरी॥
हो चिरंजीव लवलाही।
कल्पवृक्ष दुसरा होई॥ नंदनीं॥
प्रळयींच्या वटवृक्षाचें।
तुज मिळेल पद भाग्याचें। तरुवरा॥"
तो वदे। "देवि सर्व-दे,। हेंच एक दे-।
भेटवी मजला। जीविंच्या जिवाची बाला॥ एकदा॥"
सांगती हिताच्या गोष्टी।
देवांच्या तेतिस कोटी॥ मग तया॥
"ही भलती आशा बा रे॥
सोडि तूं वेड हें सारें॥ घातकी॥
स्पर्शासह मरणहि आणी।
ती तुझ्या जिवाची राणी॥ त्या क्षणीं॥
ही अशी शुध्द राक्षसी। काय मागसी।
माग तूं कांहीं। लाभले कुणाला नाही॥ जें कधीं॥"
तो हंसे जरा उपहासें।
मग सवेंच वदला त्रासें॥ त्याप्रती॥
"निष्प्रेम चिरंजीवन तें।
जगिं दगडालाही मिळतें॥ धिक तया॥
क्षण एक पुरे प्रेमाचा।
वर्षाव पडो मरणांचा। मग पुढें॥"
निग्रहें। वदुनि शब्द हे। अधिक आग्रहें!
जीव आवरुनी। ध्यानस्थ बैसला फिरुनी॥ वृक्ष तो॥
तो निग्रह पाहुनि त्याचा॥
निरुपाय सर्व देवांचा॥ जाहला॥
मग त्याला भेटायाला।
गगनांतिल चंचल बाला॥ धाडिली॥
धांवली उताविळ होत।
प्रीतीची जळती ज्योत॥ त्याकडे॥
कडकडे। त्यावरी पडे। स्पर्श जों घडे।
वृक्ष उन्मळला। दुभंगून खालीं पडला॥ त्या क्षणीं॥
दुभंगून खालीं पडला।
परि पडतां पडतां हंसला॥ एकदा॥
हर्षाच्या येउन लहरी।
फडफडुनी पानें सारीं॥ हांसलीं॥
त्या कळ्या सर्वही फुलल्या॥
खुलल्या त्या कायम खुलल्या॥ अजुनिही॥
तो योग्। खरा हटयोग। प्रीतिचा रोग।
लागला ज्याला। लाभतें मरणही त्याला॥ हें असें॥