Monday, October 1, 2007

शीगवाला - नारायण सुर्वे

शीगवाला - नारायण सुर्वे


'क्या लिखतो रे पोरा!'
'नाही चाचा - - काही हर्फ जुळवतो.'
म्हणता, म्हणता दाऊदचाचा खोलीत शिरतो
गोंडेवली तुर्की टोपी काढून
गळ्याखालचा घाम पुसून तो 'बीचबंद' पितो
खाली बसतो;
दंडा त्याचा तंगड्या पसरून उताणा होतो.


'एक ध्यानामदी ठेव बेटा!
सबद लिखना बडा सोपा है
सब्दासाठी जीना मुश्कील है.'


देख ये मेरा पाय
साक्षीको तेरी आई काशीबाय
'मी खाटीक आहे बेटा - मगर
गाभणवाली गाय कभी नही काटते.'


तो - सौराज आला; गांधीवाला।
रहम फरमाया अल्ला।
खूप जुलूस मनवला चालवालोने
तेरे बापूने -
तेरा बापू; चालका भोंपू।


हां; तर मी सांगत होता;
एक दिवस मी बसला होता कासाईबाडेपर
बकरा फाडून रख्खा होता सीगपर
इतक्यामंदी समोर झली बोम
मी धावला; देखा -
गर्दीने घेरा था; तुझ्या अम्मीला
काटो बोला
अल्ला हू अकबरवाला
खबरदार; मै बोला
सब हसले, बोले,
ये तो साला निकला पक्का हिंदूवाला


"फिर; काफिरको काटो!"
अल्लाहुवाला आवाज आला
झगडा झाला।
सालोने खूब पिटवला मला
मरते मरते पाय गमवला।
सच की नाय काशिबाय - ?


'तो बेटे -
आता आदमी झाला सस्ता - बकरा म्हाग झाला
जिंदगीमध्ये पोरा, पुरा अंधेर आला,
आनि सब्दाला;
जगवेल असा कोन हाये दिलवाला
सबको पैसेने खा डाला।'

No comments: